सलग दुसऱ्या दिवशी नागोठण्याला पुराचा वेढा
पूरपरिस्थिती हे तर पाटबंधारे खात्याचे पाप : पाटबंधारे खात्याच्या जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी

के टी बंधाऱ्याचे दरवाजे वेळेत न उघडल्यानेच बंधाऱ्याच्या परिसरात पुराचा हाहाकार : सलग दुसऱ्या दिवशी नागोठण्याला पुराचा वेढा
पाणी तुंबल्याने पाटणसई, बाळसई, वजरोली व परिसरातील शेकडो एकर शेती पाण्याखाली जाऊन शेतकऱ्यांचे नुकसान
पूरपरिस्थिती हे तर पाटबंधारे खात्याचे पाप : पाटबंधारे खात्याच्या जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी

नागोठणे | महेश पवार
नागोठण्यात सलग दुसऱ्या दिवशी पुराने हाहाकार उडविला असून एस टी स्थानक व छ शिवाजी महाराज चौक परिसर जलमय झाला आहे. नागोठणे शहर व परिसराला पुराने वेढा घातला आहे. शासनाच्या पाटबंधारे खात्याच्या कोलाड विभागांतर्गत येणाऱ्या नागोठण्याजवळील पाटणसई ग्रामपंचायत हद्दीतील अंबा नदीवर असलेल्या कोल्हापूर पद्धतीच्या (के टी) बंधाऱ्याचे दरवाजे दरवर्षीप्रमाणे यावर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला उघडले गेले नाहीत. त्यामुळेच परिणामी बंधाऱ्याच्या पात्रात मोठ्या प्रमाणात हे पाणी आडून राहिल्याने अंबा नदीच्या पाण्याच्या पातळीत प्रचंड वाढ होऊन हे पाणी पाटणसई, बाळसई, वजरोली व परिसरातील शेतात मोठ्या प्रमाणात तुंबून राहिल्याने या गावांतील शेतकऱ्यांची शेकडो एकर भातशेती पाण्याखाली गेली आहे. गेले पाच ते सहा दिवसांपासून शेतातील राब पाण्याखाली असल्याने ते कुजणार असल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवणार आहे. त्यामुळे के टी बंधाऱ्याचे दरवाजे वेळीच न उघडण्यास जबाबदार असणाऱ्या पाटबंधारे खात्याच्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
महामार्गावर शेकडो प्रवासी पडलेत अडकून : सरकारी यंत्रणेची मदत आवश्यक

के टी बंधाऱ्याचे दरवाजे वेळेत उघडले न गेल्यामुळे बंधाऱ्याचे पाणी मागे उलटून मुंबई गोवा महामार्गावर चिकणी, वाकण नाका, वाकण – बाळसई रस्ता, वाकण – पाली रस्ता शनिवारी रात्रीपासून पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे महामार्गावरून प्रवास करणारे शेकडो प्रवासी, वाहन चालक महामार्गावर अडकून पडले आहेत. त्यांच्या खाण्यापिण्याचे हाल सुरू आहेत. स्थानिक नागरिक त्यांना मदत करीत असले तरी ते अजून किती मदत करणार हा प्रश्न असल्याने सरकारी यंत्रणेकडून त्यांना वेळीच मदत पोहोचणे अत्यावश्यक झाले आहे.
के टी बंधाऱ्याचे दरवाजे एकदम उघडल्यास नागोठण्यात होणार मोठी पूरस्थिती
पावसाचा जोर कायम असल्याने नागोठणे शहर व परिसरात पुराचे पाणी वाढतच आहे. त्यामुळे नागरिकांत घबराट निर्माण झाली आहे. नागोठण्यातील के टी बंधाऱ्याच्या एकूण ३० दरवाज्यांपैकी केवळ तीनच दरवाजे उघडले गेले आहेत. एकीकडे के टी बंधारा तुडुंब भरल्याने केवळ तीन दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने बंधाऱ्यातील किती पाणी वाहून जाणार हा प्रश्न आहे. पाऊस थांबला तर बंधाऱ्याचे दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग करणे सोपे जाईल मात्र पावसाचा जोर कायम असतानाच जर के टी बंधाऱ्याचे आणखी काही दरवाजे उघडल्यास नागोठण्यात मोठी पूर परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे बंधाऱ्याचे दरवाजे उघडताना पाटबंधारे खात्याला अत्यावश्यक ती काळजी घ्यावी लागणार आहे.

पूरपरिस्थिती हे तर पाटबंधारे खात्याचेच पाप
अंबा नदीवरील के टी बंधाऱ्याचे दरवाजे पाटबंधारे कोलाड विभागाकडून दरवर्षी पावसाळ्यापूर्वी उघडण्यात येत असतात. याआधीही अनेकदा पाटणसई ग्रामपंचायत प्रशासनाच्या व स्थानिक नागरिकांच्या मदतीने पाटबंधारे विभागाकडून बंधाऱ्याचे दरवाजे वर उचलण्यात आले आहेत. मात्र, यावर्षी सुरुवातीला पावसाचे प्रमाण कमी असताना बंधाऱ्याचे दरवाजे उघडण्याची तत्परता पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांनी दाखविली नाही. नंतर पावसाने जोर पकडल्याने बंधाऱ्याचे दरवाजे उघडणे राहून गेल्याने बंधारा तुडुंब भरला. के टी बंधाऱ्याचे दरवाजे उघडण्याचे काम वेळेत न केल्यामुळे पाण्याचा दाब वाढल्याने बंधाऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्याचा मोठ्या प्रमाणात भराव वाहून जाऊन तेथून पाण्याचा मोठा प्रवाह नागोठण्याकडे वाहू लागला आहे. या पुरामुळे शेतकरी बांधवांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

तत्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई देण्यात यावी व के टी बंधाऱ्यावर सक्षम अधिकारी नेमावा : सदानंद गायकर
पाटणसई ग्रामपंचायत हद्दीतील केटी बंधाऱ्याच्या शेजारील परिसरातील शेतकऱ्यांना तसेच नागरिकांना तसेच नागरिकांना याआधीही अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागले आहे. सद्य परिस्थितीतही पाटणसई व परिसरातील अनेक शेतकऱ्यांची शेतजमीन पाच ते सहा दिवसांपासून पाण्याखाली गेली आहे. केवळ पाटबंधारे विभागाच्या हलगर्जीपणामुळेच हे घडले आहे. त्यामुळे पूर ओसरताच महसूल खात्याच्या रोहा तहसीलदार कार्यालयामार्फत नुकसानग्रस्त शेतीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश देऊन शेतकरी बांधवांना नुकसानभरपाई मिळवून द्यावी तसेच भविष्यात के टी बंधाऱ्याच्या कार्यक्षेत्रासाठी एक जबाबदार सक्षम अधिकारी नेमण्याची मागणी रोहा पंचायत समितीचे माजी सभापती आणि पाटणसई येथील नागरिक सदानंद गायकर यांनी केली आहे.
दरम्यान यासंदर्भात पाटबंधारे खात्याचे उपअभियंता देवेंद्र लोकरे यांच्याशी संपर्क साधला असता, सद्य स्थितीत बंधाऱ्याचे ३ दरवाजे उघडण्यात आले असून आणखी काही दरवाजे उघडण्याचे काम सुरू असल्याने बंधाऱ्याचे दरवाजे यावर्षी वेळेत का उघडले गेले नाही याविषयी माहिती घेऊन सांगितले जाईल अशी संतापजनक प्रतिक्रिया देवेंद्र लोकरे यांनी प्रस्तुत प्रतिनिधीजवळ व्यक्त केली.




