कुहिरे ग्रामस्थ व महिलांचा आक्रोश
रिलायन्सचे कुहिरे गेट आंदोलन चिघळणार

नागोठणे रिलायन्स कंपनी विरोधात कुहिरे गावातील ग्रामस्थ व महिलांचा आक्रोश
रिलायन्सचे कुहिरे गेट आंदोलन चिघळणार
रिलायन्स कंपनी प्रशासनाविरोधात लवकरच ठिय्या आंदोलन
नागोठणे | महेश पवार

भारत देशातील नामवंत उद्योग समूह असलेल्या धीरूभाई अंबानी यांच्या अंबानी समूहातील नागोठणे मॅन्युफॅक्चरिंग डिव्हिजन (NMD ) अंतर्गत रिलायन्स समूहाचा सुमारे ७० हजार कोटी रुपयांच्या नवीन प्रकल्पाचे काम युद्ध पातळीवर सुरू असतांनाच उर्वरित हजारो प्रकल्पग्रस्तांना रिलायन्स प्रशासन व शासनाने वाऱ्यावर सोडले आहे. त्यातच कुहिरे येथे नव्याने उभारण्यात आलेल्या प्रवेशद्वाराला अनेक कारणास्तव कुहीरे ग्रामस्थांचा तीव्र विरोध असतानाही रिलायन्स प्रशासनाची मनमानी सुरू असल्याने संतप्त झालेल्या कुहिरे गावातील ग्रामस्थांनी व महिलांनी आक्रोश केला आहे. कुहीरे गेट बंद न केल्यास आम्ही इथे उग्र ठिय्या आंदोलन करू असा इशारा ग्रामस्थांनी दिला असल्याने कुहिरे गेट प्रकरण आता चिघळणार असल्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

रिलायन्स कंपनीने बायोगॅस व रिलायन्स अंतर्गत विस्तारीत प्रकल्पासाठी सुमारे ७० हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यासाठी रिलायन्स प्रशासनाने जामनगर सारखा नागोठणे परिसराचा विकास करू असे गाजर स्थानिकांना दाखविले आहे. मात्र रिलायन्स प्रशासनाचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. विस्तारित प्रकल्पाचे काम सुमारे ५ वर्षे व त्याहून अधिक काळ चालणार असतांनाच कंपनीने उर्वरित प्रकल्पग्रस्त व स्थानिक नागरिकांना वाऱ्यावर सोडल्याचे दिसून येत आहे. रिलायन्स कंपनीने काही मोजक्याच जुन्या ठेकेदारांना व पुढाऱ्यांना हाताशी धरून स्थानिक लोकांना रोजगाराचे कोणतेही साधन न देता बाहेरील व्यक्तींना छोटे – मोठे अनेक प्रकारचे ठेके दिले असल्याचे दिसून येत आहे.

रिलायन्स कंपनीने कुहिरे येथे उभारलेल्या नवीन गेटला स्थानिक ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. ग्रामस्थांना कोणत्याही प्रकारे विश्वासात न घेता या गेटची उभारणी करण्यात आली आहे. वाढत्या अवजड वाहतुकीमुळे येथील ग्रामस्थांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो, असा गंभीर आरोप कुहिरे ग्रामस्थांनी केला आहे. रिलायन्स कंपनीच्या या मनमानी कारभाराविरोधात सर्व ग्रामस्थ एकवटले असून गावातील महिलांनी अतिशय आक्रमक पवित्रा घेतला आहे.
रिलायन्सकडे ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्या :-
रिलायन्सने रोजगाराचा प्रश्न सोडवावा : कुहिरे गावासमोरील या गेटमुळे रोजगाराचे साधन निर्माण करणाऱ्या येथील छोट्या विविध प्रकारच्या टपऱ्या, छोट्या हॉटेल्सवर उदरनिर्वाह करणाऱ्या स्थानिक, गोरगरीब लोकांचा रोजगार हिरावला जाणार आहे. ज्या स्थानिकांच्या जमिनी♦ प्रकल्पात गेल्या, त्यांना आणि त्यांच्या मुलांना रोजगार न देता इतर ठिकाणच्या लोकांना नोकऱ्या दिल्या जात आहेत.
अपघाताचा धोका असल्याने गतिरोधक उभारा : कुहिरे गावच्या थांब्यासमोरच शाळकरी मुले बसेसमधून चढत उतरत असतात. या रस्त्यावरून रिलायन्सच्या विस्तारित प्रकल्पासाठी मालवाहतूक करणारी अनेक मोठ मोठी वाहने भरधाव वेगाने ये जा करीत असतात.
मात्र याठिकाणी एकही गतिरोधक नसल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. काही दिवसांपूर्वीच याठिकाणी एका तरुणाचा अपघात झाला होता, ज्याची कंपनीने दखल घेतली नाही. त्यामुळे कुहिरे थांब्याजवळ कंपनीने तत्काळ गतिरोधक उभारावेत.रिलायन्स विरोधात ग्रामस्थांचे आरोप
दडपशाही आणि मनमानी कारभार : रिलायन्सच्या इस्टेट ऑफिसमध्ये झालेल्या बैठकीत गेटबाबत कोणताही सकारात्मक निर्णय किंवा आश्वासन देण्यात आले नाही. कुहिरे ग्रामपंचायतीची परवानगी न घेता सिमेंट काँक्रीटचा रस्ता आणि ग्रील उभारण्यात आले आहे. तसेच
याप्रकरणी विरोध करणाऱ्या तरुणांचे गेटपास बंद केले जात आहेत आणि त्यांच्या घरच्यांवर दबाव टाकला जात आहे असा आरोपही ग्रामस्थ करीत आहेत.

महिलांची छेडछाड करण्याचे प्रकार :-
काही दिवसांपूर्वीच रिलायन्सच्या एका बड्या अधिकाऱ्याकडून महिलेची छेडछाड करण्याचा प्रकार घडल्याची व याप्रकरणी नागोठणे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची घटना ताजी असतानाच रिलायन्सच्या विस्तारित प्रकल्पातील कर्मचारी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन महिलांचे पाठीमागून अश्लील व्हिडिओ काढत असल्याचा आणि शिट्ट्या मारत असल्याचा संतापजनक व गंभीर आरोप स्थानिक महिलांनी केला आहे. महिलांनी छेडछाडीचे केलेले आरोप धक्कादायक आहेत. एवढी मुजोरी यांना येते कुठून हा देखील प्रश्न उपस्थित होत आहे.
कुहिरे ग्रामस्थांचा ठिय्या आंदोलनाचा इशारा :
रिलायन्स कंपनीला किंवा कंपनीच्या विस्तारित प्रकल्पाला आमचा विरोध नाही. कंपनीने हा गेट १०० मीटर पुढे किंवा मागे हलवावा, अशी कुहिरे ग्रामस्थांची रास्त मागणी आहे. मात्र, जर रिलायन्सने जबरदस्तीने हा गेट कुहिरे गावावर लादण्याचा प्रयत्न केला, तर गावातील आम्ही सर्व ग्रामस्थ व महिला गेटसमोर ठिय्या आंदोलन करू. या आंदोलनातून काही नुकसान वा जीवितहानी झाल्यास त्याला सर्वस्वी रिलायन्स प्रशासन व सरकारी यंत्रणा जबाबदार असेल, असा स्पष्ट इशारा कुहिरेतील संतप्त ग्रामस्थ व महिलांनी दिला आहे.




