E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifकलाक्रीडाखेलधार्मिकमहाराष्ट्रयुवाराज्यलोकल न्यूज़
आई जोगेश्वरी गोविंदा पथकाचा थरार
पालीतील दोन्ही मनाच्या दहीहंड्या आई जोगेश्वरी गोविंदा पथकाने फोडल्या

नागोठण्याच्या आई जोगेश्वरी गोविंदा पथकाचा पालीत थरार
पालीतील दोन्ही मनाच्या दहीहंड्या आई जोगेश्वरी गोविंदा पथकाने फोडल्या
११ वर्षीय बाल गोविंदा कुमारी पल्लवी दत्ता पाटील हिचेही कौतुक

नागोठणे | महेश पवार
नागोठण्यात गेल्या ३–४ वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या एक गाव एक गोविंदा टॅग लाइन खाली एकत्र आलेल्या आई जोगेश्वरी गोविंदा पथकाने आपल्यातील सर्व कलाकुसर पणाला लावत, नागोठण्याजवळील पाली (ता.सुधागड) येथील प्रकाशभाऊ देसाई मित्रमंडळ व शिंदे शिवसेना यांच्याकडून बांधण्यात आलेल्या दोन्ही मानाच्या दही हंड्या रायगड जिल्ह्यात प्रथमच चारच्या बेसवर आठ थर लावून फोडण्याची अभिमानास्पद कामगिरी केली आहे. तसेच आठव्या थरावरील ११ वर्षीय बाल गोविंदा असलेली नागोठणे रामनगर येथील कुमारी पल्लवी दत्ता पाटील हिच्या धाडसाचेही सर्वत्र कौतुक होत आहे.

नागोठण्यातील सर्व आळींमधून तसेच शहरातील सर्वच भागातून पूर्वीपासून सुरू असलेल्या गोविंदा पथकाने एकत्र येत ३–४ वर्षांपूर्वी आई जोगेश्वरी गोविंदा पथक स्थापन केले होते. ज्याप्रमाणे रोहा शहरात एक गाव एक गणपती अस्तित्वात आहे, त्याप्रमाणेच नागोठण्यातील तरुणांनी गोविंदा पथकाच्या निमित्ताने एकत्र यावे आणि त्यामुळे गावातील तरुणांमधील आपली एकजूट तरुणांची एकी टिकून राहण्यास मदत होईल अशी इच्छा नागोठण्यातील किशोर जैन मित्र मंडळाचे सर्वेसर्वा किशोरभाई जैन यांनी तरुणांजवळ व्यक्त केली होती आणि त्यासाठी आपण सर्वोतोपरी सहकार्य करण्यास तयार आहोत असेही आश्वासनही किशोरभाई जैन यांनी या तरुणांना दिले होते. त्यानुसारच नागोठण्यातील विविध आळीतील तरुणांचे गोविंदा पथक तसेच विभागातील काही तरुणांनी एकत्र येत आई जोगेश्वरी गोविंदा पथक स्थापन केले होते. या गोविंदा पथकाचे अध्यक्ष असलेले विहान जिमचे मालक भरत गिजे, प्रशिक्षक राजेश सुर्वे, रवी जासूद व स्वप्निल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व तरुण व बालगोपालांच्या सहकार्याने कसून सराव करून आई जोगेश्वरी गोविंदा पथकाने हे भव्य दिव्य यश मिळविले आहे.

नागोठण्यातील आई जोगेश्वरी गोविंदा पथकाने पाली येथील शिवसेनेची रुपये ३ लाख, ३५ हजार रुपयांची मानाची दहीहंडी व भाजपा नेते प्रकाशभाऊ देसाई मित्र मंडळाची रुपये ३ लाख, ३३ हजार, ३३३ रुपयांची मानाची दहीहंडी यावरच आपले लक्ष केंद्रित करून त्या फोडण्याचा मान मिळविला. रोहा येथील मानाच्या दही हंडीला सलामी दिल्यानंतर सायंकाळी आई जोगेश्वरी गोविंदा पथक पाली येथे रवाना झाले. पाली मधील मानाच्या या दोन्ही दही हंड्या आठ थर लावून पहिल्याच प्रयत्नांत अगदी सहजपणे फोडून आई जोगेश्वरी गोविंदा पथकाने सुधागड तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात आपल्या नाव लौकिकात भर घातली. आई जोगेश्वरी गोविंदा पथकाच्या या यशाबद्दल त्यांच्यावर नागोठण्यासह संपूर्ण विभागातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.




