E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifकायदा व सुव्यवस्थाटॉप न्यूज़धार्मिकमहाराष्ट्रयुवाराज्यलोकल न्यूज़
जुगार खेळाल, तर आतमध्ये बसाल
जुगार–यांवर गुन्हे दाखल करण्याचा सपोनि रविंद्र पारखे यांचा सज्जड इशारा

गणेशोत्सवात जुगार खेळाल, तर आतमध्ये बसाल
जुगार–यांवर गुन्हे दाखल करण्याचा सपोनि रविंद्र पारखे यांचा सज्जड इशारा
डीजे मालकांवरही होणार गुन्हे दाखल
नागोठणे | महेश पवार
आगामी गणेशोत्सव काळात नागोठणे पोलीस ठाण्याचे हद्दीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, गणेशोत्सव शांततेत व उत्साहात पार पडावा, यासाठी नागोठणे पोलिसांनी कंबर कसली आहे. गणेशोत्सवाच्या काळात पैसे लावून जुगार अथवा पत्ते खेळताना आढळल्यास जुगार–यांवर थेट गुन्हे दाखल करण्यात येतील, असा सज्जड इशारा नागोठणे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि रविंद्र पारखे यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागोठणे पोलीस ठाण्यात सोमवारी (दि.७) संपन्न झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत दिला.

नागोठणे पोलीस ठाण्यात सोमवारी (दि.७) सकाळी ११ वाजता संपन्न झालेल्या या बैठकीला रोहाचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रसाद गोकुळे, पोलिस कर्मचारी स्वप्निल भालेराव, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते कृष्णाजी धामणे, नागोठणे उपसरपंच ज्ञानेश्वर साळुंखे, वीज वितरणचे सहाय्यक अभियंता सत्येंद्र सिंग, बाजारपेठ गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष अंकुश जैन, हायवे नाका गणेशोत्सव मंडळाचे रामचंद्र देवरे, दत्ताराम झोलगे, धनंजय जगताप, बाळू रटाटे, शंकर भालेकर, बाबा मुल्ला, विकास जाधव, विजय पाटील, काशिनाथ शिद, महिला दक्षता समिती सदस्या शबाना मुल्ला, अपर्णा सुटे, संगिता पोलसानी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सपोनि रविंद्र पारखे पुढे म्हणाले की, पैसे लावून पत्ते खेळण्यापेक्षा कॅरम, बुद्धिबळ यांसारखे मनोरंजनात्मक खेळ खेळा. नागोठणे शहर व विभागातील नागरिक अतिशय शांत व संयमी असून सर्व समाजबांधव गुण्यागोविंदाने सण-उत्सव साजरे करतात, असे सांगत त्यांनी नागोठणेकर नागरिकांचे कौतुक केले. गणेशोत्सव काळात सोशल मीडियाचा गैरवापर करू नये. कोणत्याही समाजाच्या भावना दुखावतील असे आक्षेपार्ह देखावे, पोस्ट अथवा मजकूर प्रसारित करू नये, अशा सूचना देऊन गणेशोत्सव मंडळांनी सामाजिक सलोखा व शांतता अबाधित ठेवण्यास सहकार्य करावे, असे आवाहनही यावेळी सपोनि रविंद्र पारखे यांनी केले. गणेशोत्सव काळात स्पीकर अथवा डीजेचा आवाज ७५ डेसिबलपेक्षा जास्त असता कामा नये, नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधित साहित्य जमा करून स्पीकर व डीजे मालकांवर गुन्हे दाखल करण्यात येतील.

गणेशोत्सवाच्या काळात वाहतूक वाढण्याची शक्यता लक्षात घेता नागोठणे हद्दीतील महामार्गावरील खड्डे गणेशोत्सवापूर्वी बुजवून रस्ता सुस्थितीत करण्याच्या सूचना महामार्ग ठेकेदाराला देण्यात आल्या आहेत. तसेच वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करण्यात येणार असून हे पर्यायी मार्गही सुस्थितीत ठेवावेत, अशा सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आल्याचे सपोनि रविंद्र पारखे यांनी सांगितले. गणेशमूर्ती विसर्जनाच्या ठिकाणी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना व चोख व्यवस्था ठेवण्यात यावी, अशा सूचनाही सपोनि रविंद्र पारखे यांनी दिल्या. दरम्यान यावेळी पोलिस उपविभागीय अधिकारी प्रसाद गोकुळे यांनी देखील मोलाचे मार्गदर्शन केले.




