बाळसई येथे होळी व धुळवड सण उत्साहात साजरा
तरुणवर्गांनी लुटला मनसोक्त आनंद

बाळसई येथे होळी व धुळवड सण उत्साहात साजरा
तरुण वर्गांनी लुटला मनसोक्त आनंद
सुकेळी (दिनेश ठमके) : रोहा तालुक्यासह नागोठणे परिसरामध्ये होळी व धुळीवंदन सण सोमवार व मंगळवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. येथिल बाळसई गावामध्ये देखिल सोमवारी सायंकाळी गावातील महिलांनी होळीका मातेचे पुजन केल्यानंतर रात्री १२ वाजता होळीका दहन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बाळसई गावचे अध्यक्ष मधुकर ठमके यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व ग्रामस्थांनी होळी भोवताली गाणी बोलत ५ फे-या मारल्यानंतर होळी पेटवण्यात आली.
त्याचप्रमाणे मंगळवारी संपूर्ण बाळसई गावामध्ये लहान मुलांसह नागरिकांनी एकमेकांना रंग लावून धुळीवंदन साजरी केली. ढोल -ताशाच्या ताळावर सर्वच तरुण मुलांनी ठेका धरत नृत्य केले. यावेळी तरुण तसेच लहान मुलांनी रंगाची मुक्तपणे उधळण करुन मोठ्या जल्लोषात धुळवड साजरी केली. सर्वांनी एकत्रित येऊन एकमेकांना शुभेच्छा देत रंग लावण्यात आला. सकाळपासूनच धुळीवंदनाला सुरुवात झाल्यामुळे तरुण मुले गटागटाने फिरुन एकमेकांना रंग लावुन शुभेच्छा देत होते. त्याचप्रमाणे रंग न खेळता घरात राहीलेल्यांना घराबाहेर काढुन रंग लावण्यात येत होते. दरम्यान यावेळी ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये एक गाव एक होळी असल्याचे चित्र पहावयास मिळत होते.




