E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifकायदा व सुव्यवस्थाक्राइममहाराष्ट्रयुवाराज्यलोकल न्यूज़
अवैध दारू प्रकरणी नागोठणे पोलिसांची दबंग कारवाई
अवैध दारू विरोधी मोहीम अधिक तीव्र करणार : सपोनि सचिन कुलकर्णी

अवैध दारू प्रकरणी नागोठणे पोलिसांची दबंग कारवाई : आरोपी फरार
वाघ्रणवाडी जंगलातील हातभट्टी नागोठणे पोलिसांकडून उध्वस्त : १६०० लिटर गुळमिश्रित रसायनही केले नष्ट
१४० लिटर तयार दारूसह २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
अवैध दारू विरोधी मोहीम अधिक तीव्र करणार : सपोनि सचिन कुलकर्णी
नागोठणे | महेश पवार
नागोठणे पोलिस ठाण्याचा पदभार स्विकारल्यापासून गावठी दारुवि रोधी मोहिम हाती घेतलेले सहाय्यक पोलिस निरिक्षक सचिन कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली नागोठणे पोलिस ठाण्याच्या पोलिस पथकाने रविवारी (दि.१४) सकाळी आणखी एक मोठी दबंग कारवाई केली. या कारवाईत नागोठण्याजवळील वाघ्रणवाडी आदिवासी वाडीच्या जंगल परिसरातील एक मोठी हातभट्टी उध्वस्त करुन सुमारे ८ हजार रुपये किंमतीचे १६०० लिटर गुळमिश्रित रसायनही पोलिसांनी नष्ट केले आहे. तर ७ रबरी ट्यूब मधील १४ हजार रुपये किंमतीची १४० लिटर तयार गावठी दारू पोलिसांनी जप्त केली आहे. याप्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, कलम ६५(ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील आरोपी उत्तम शिद, रा. वाघ्रणवाडी, ता.रोहा हा फरार असून नागोठणे पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

नागोठणे पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी नागोठण्याजवळील वाघ्रणवाडी जंगलात १५ किलोमीटर आत जाऊन ही धाड टाकली. या धाडीत गावठी दारु निर्मितीच्या हातभट्टीच्या ठिकाणी ८ प्लास्टिकच्या बॅरलमध्ये प्रत्येकी २०० लिटर असे एकूण १६०० लिटर गुळमिश्रित रसायन सापडले. गेल्या काही दिवसांतील ही मोठी धाड असलेल्या या गुळमिश्रित रसायनाची किंमत ५० रुपये प्रति लिटर दराने ८ हजार रुपये असल्याची तसेच रबराच्या ७ ट्यूब मध्ये प्रत्येकी २० लिटर दारूची किंमत प्रति लिटर रुपये १०० याप्रमाणे तयार दारूची किंमत १४ हजार रुपये असा एकूण २२ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केल्याची माहिती सापोनि सचिन कुलकर्णी यांनी दिली. आठ प्लॅस्टिक बॅरल मधील गुळमिश्रित रसायन हा माल वाहतुकीस अवजड व अवघड असल्याने सदरचा मुद्देमाल हा जागीच नष्ट करण्यात आला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल, अप्पर पोलीस आयुक्त अभिजीत शिवथरे, पेण उपविभागीय अधिकारी जालिंदर नालकुल यांच्या मार्गदर्शनाखालीस. पो.नि. सचिन कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली नागोठणे पोलिस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक रमेश सोनकर, पोलीस शिपाई गणेश चोरगे, पोलीस शिपाई शिवदास धुळगंडे व दोन पंच यांच्या पथकाने ही महत्वपूर्ण कारवाई केली. या कारवाईमुळे नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत असून यामुळे गावठी दारु माफिये मात्र पुरते हैराण झाले आहेत. दरम्यान नागोठणे पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जंगलात गावठी दारू तयार करणाऱ्या भट्ट्यांचा ड्रोन कॅमेराद्वारे शोध घेऊन गावठी दारू विरोधातील ही मोहीम अधिक तीव्र करणार असल्याचे नागोठणे पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सचिन कुलकर्णी यांनी स्पष्ट केले आहे.



