E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifकायदा व सुव्यवस्थाक्राइममहाराष्ट्रयुवाराज्यलोकल न्यूज़
नागोठणे पोलिसांच्या कारवाईने गावठी दारू माफिया धास्तावले
चेराठी, काळकाई जंगल परिसरातील हातभट्टीवर नागोठणे पोलिसांचा हातोडा

नागोठणे पोलिसांच्या कारवाईने गावठी दारू माफिया धास्तावले
चेराठी, काळकाई जंगल परिसरातील हातभट्टीवर नागोठणे पोलिसांचा हातोडा
दोन ठिकाणी धडक कारवाई करून हातभट्टीचे समूळ उच्चाटन
नागोठणे | महेश पवार
रायगडच्या पोलिस अधिक्षक आँचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली नागोठणे पोलिस ठाणे हद्दीतील गावठी दारू विरोधातील मोहीम नागोठणे पोलिसांनी अधिकाधिक तीव्र केली आहे. याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी (दि.१९) सकाळी मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे नागोठणे – रोहा मार्गालगतच्या चेराठी, काळकाई या आदिवासी वाड्यांतील जंगल परिसरात सुमारे २५ किलोमीटर आत जाऊन नागोठणे पोलिसांनी दोन ठिकाणी धडक कारवाई करून हातभट्टीचे समूळ उच्चाटन केले. नागोठणे पोलिसांच्या सततच्या कारवाईमुळे नागोठणे हद्दीतील जंगल परिसरात गावठी दारूची निर्मिती करणारे दारू माफिया चांगलेच धास्तावले आहेत.

यासंदर्भात उपलब्ध झालेल्या माहितीनुसार चेराठी, काळकाई जंगल परिसरात अवैधरित्या गावठी दारूची निर्मिती करून विक्री करता बाळगली जात असल्याची माहिती नागोठणे पोलिसांना उपलब्ध झाली. मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती. आँचल दलाल, अप्पर पोलीस अधीक्षक, अभिजीत शिवथरे, उपविभागीय अधिकारी, रोहा प्रसाद गोकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली नागोठणे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी स.पो.नि सचिन कुलकर्णी, पो. ह. महेश लांगी, पो. हवा. अथर्व पाटील, सहा. फौजदार कृष्णा म्हात्रे ,पो. शि. स्वप्निल भालेराव व पथक यांनी चेराठी – काळकाई जंगल परिसरामध्ये २५ किलोमीटर आत जंगलात जाऊन गावठी हातभट्टी दारूचे अड्डा उध्वस्त करून समूळ उच्चाटन केले.
या दोन गुन्ह्यात एकूण १ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून जागीच नष्ट करण्यात आला आहे. पहिल्या ठिकाणी एकूण २० लिटर तयार गावठी दारू व १ हजार लिटर गूळ मिश्रित रसायन एकूण किंमत रुपये ५२ हजार तर दुसऱ्या ठिकाणी एकूण २५ लिटर तयार गावठी दारू व १४०० लिटर गूळ मिश्रित रसायन एकूण किंमत रुपये ७२ हजार एवढ्या किंमतीचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला.
याप्रकरणी नागोठणे पोलीस ठाण्यामध्ये महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, कलम ६५ (ई) अन्वये दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी पुढील तपास नागोठणे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली नागोठणे पोलिस करीत आहेत.




