Welcome to रायगडचा बुलंद आवाज   Click to listen highlighted text! Welcome to रायगडचा बुलंद आवाज
E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifपूरमहाराष्ट्रयुवाराज्यलोकल न्यूज़

अंबा नदीने धारण केला रुद्रावतार 

आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणेपुढे नागरिकांच्या सुरक्षेचे आव्हान !

अंबा नदीने धारण केला रुद्रावतार : अंबा नदीच्या पुरामुळे नागोठणे शहर व परिसरात सर्वत्र पाणीच पाणी 

सुरक्षेच्या कारणास्तव वीजपुरवठा बंद : नागोठणे परिसरात अनेक ठिकाणी विजेचे खांब कोसळल्याने वीजपुरवठा कधी सुरू होणार हा प्रश्न ?
आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणेपुढे नागरिकांच्या सुरक्षेचे आव्हान !
नागोठणे | महेश पवार
गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने रायगड जिल्ह्यासह नागोठणे परिसराला अक्षरशः झोडपून काढले असतानाच गेले दोन-चार दिवसांपासून दुथडी भरून वाहणाऱ्या नागोठण्यातील अंबा नदीने शनिवार दिनांक ४ जुलै रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास धोक्याची पातळी ओलांडली होती. यानंतर अगदी काही तासांतच रात्री नागोठणे अंबा नदीच्या काठावरील सखल भागात हे पाणी शिरले. रविवारी(दि.५) सकाळी नागोठण्यातील एस.टी.स्थानक, आठवडा बाजार, छत्रपती शिवाजी महाराज चौक व बाजारपेठ, बंगले आळी, श्री मरिआई मंदिरा समोरील मिनिडोर रिक्षा स्टँड व श्री मरिआई मंदिर परिसर, नागोठणे कोळीवाडा, हॉटेल लेक व्ह्यू समोरील परिसरात यावेळी पूराचे पाणी शिरले. या पुरामुळे अंबा नदीवरील ऐतिहासिक पुल पूर्णतः पाण्याखाली गेला आहे. 

(नागोठणे : के टी बंधाऱ्यात पुराच्या पाण्याने उग्र रूप धारण केल्याचे दिसत आहे)

आपत्कालीन यंत्रणेपुढे नागरिकांच्या सुरक्षेचे आव्हान :
पावसाचा जोर कायम असल्याने अंबा नदीच्या पुराच्या पातळीत मिनिटा–मिनिटाने वाढ होत आहे. त्यामुळे पुरामुळे नागोठणे शहर व परिसरात सर्वत्र पाणीच पाणी झाल्याचे दिसून येत आहे.  सुरक्षेच्या कारणास्तव वीजवितरणने वीजपुरवठा बंद केल्याने आणि परिसरात अनेक ठिकाणी विजेचे खांब कोसळल्याने नागोठणे विभागातील वीजपुरवठा नक्की कधी सुरू होणार याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तर  पावसाचा जोर वाढत असल्याने आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणेपुढे नागरिकांच्या सुरक्षेचे आव्हान निर्माण झाले आहे.
 
भिसे खिंडीत दरड कोसळली
अतिवृष्टीमुळे नागोठणे रोहा मार्गावरील भिसे खिंडीत रात्री दरड कोसळली आहे. जेसीबीच्या सहाय्याने रस्ता मोकळा करण्याचे काम सुरू आहे. नागोठणे पोलिस ठाण्यातील प्रभारी अधिकारी, स.पो.नि. रविंद्र पारखे आपल्या पोलिस स्टाफसह घटनास्थळी गेले होते. तसेच सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कर्मचाऱ्यांकडून ही दरड हटवण्याचे काम सुरू करण्यात आले होते नंतर ही दरड हटविण्यात आली होती. मात्र पावसामुळे भिसे खिंडीत झाडे कोसळून रस्त्यावर दरड पडत असल्याने हा मार्ग तूर्तास बंद करण्यात आल्याने नागरिकांनी या मार्गावरून प्रवास करणे टाळावे अशा सूचना रोहा तहसीलदार डॉ. किशोर देशमुख यांनी दिल्या आहेत.
नागोठणे परिसरात मुंबई गोवा महामार्गावर पाणीच पाणी झाल्याने महामार्ग सुमारे १० तासाहून अधिक काळ बंदच : रोहा पं. स. चे माजी सभापती सदानंद गायकर यांचे सहकार्य 
मुंबई गोवा महामार्गावरील सुकेळी, चिकणी, पाटणसई,  वाकण – पाली मार्ग, नागोठणे येथील आय. टी. आय.  समोरील महामार्गावर पुराचे पाणी आल्याने महामार्ग सुमारे १० तासाहून अधिक काळ बंद झाला आहे. त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. वाकण नाका येथे मोठ्या प्रमाणात वाहने अडकून राहिल्याने त्यातील नागरिकांना रोहा पंचायत समितीचे माजी सभापती सदानंद गायकर यांनी पाटणसई येथील आपल्या निवासस्थानी आसरा देऊन त्यांच्या भोजनाची व्यवस्था केली होती. 
नागोठणे शहर व परिसरातील वीजपुरवठा अनिश्चित काळासाठी बंद
नागोठणे शहरात पुराचे पाणी आल्याने तसेच काही ठिकाणचे ट्रान्सफॉर्मर पुराच्या पाण्यात बुडाले आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव महावितरण कडून नागोठणे शहर व परिसरातील वीजपुरवठा मध्यरात्री बंद करण्यात आला आहे.  वाकण – पाटणसई पेट्रोल पंप जवळील ट्रान्सफॉर्मर पूर्णपणे पाण्यात बुडाला आहे त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने तेथील वीजपुरवठाही पूर्णपणे बंद ठेवण्यात आला आहे.  पुराचे पाणी पूर्णपणे ओसरल्यानंतरच वीजपुरवठा सुरळीत चालू होईल असे महावितरण कंपनीच्या नागोठणे शाखेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र पुराच्या पाण्यात सातत्याने वाढ होत असल्याने आणि नागोठणे परिसरात अनेक ठिकाणी विजेचे खांब, वीज वाहिन्यांचे नुकसान झाल्याने नागोठणे विभागातील वीजपुरवठा अनिश्चित काळासाठी बंद झाला आहे. त्यामुळे दुरुस्तीच्या कामासाठी खूप वेळ लागणार असल्याने  नागरिकांचे खूपच हाल होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!