E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifटेक्नोलॉजीमहाराष्ट्रयुवाराजकारणराजनीतिराज्यलोकल न्यूज़वाहतूक
नागोठणे रेल्वे क्रॉसिंग उड्डाण पूल
ना. आदितीताई तटकरे व आ. अनिकेत भाई तटकरे यांच्या सहकार्याने किशोरभाई जैन यांच्या पाठपुराव्याला यश

खा. सुनील तटकरेंमुळे नागोठणे रेल्वे क्रॉसिंग उड्डाण पूलाला १०० कोटी रुपये निधीची मंजुरी
ना. आदितीताई तटकरे व आ. अनिकेत भाई तटकरे यांच्या सहकार्याने किशोरभाई जैन यांच्या पाठपुराव्याला यश
नागोठणे शहर व विभागातील तमाम जनतेला आणि विद्यार्थ्यांना दिलासा
“रेल्वे क्रॉसिंगमुक्त महाराष्ट्र” योजनेमध्ये नागोठण्यातील रेल्वे क्रॉसिंग उड्डाणपुलाचा समावेश
नागोठणे | महेश पवार
महाराष्ट्र शासनाने आपल्या संकल्पनेतून “रेल्वे क्रॉसिंगमुक्त महाराष्ट्र” ही महत्त्वाकांक्षी योजना हाती घेतली असून, राज्यातील सुमारे १६० रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपूल (ओव्हरब्रिज) उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या योजनेत रायगड जिल्ह्यातील नागोठणे येथे रेल्वे क्रॉसिंग उड्डाणपुलाचा समावेश करण्यात आला आहे. खा. सुनील तटकरे यांच्यामुळे नागोठणे रेल्वे क्रॉसिंग उड्डाण पूलाला तब्बल १००.६६ कोटी रुपये निधीची मंजुरी मिळाली आहे. या रेल्वे क्रॉसिंग उड्डाणपुलासाठी राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री अदितीताई तटकरे व आ. अनिकेभाई तटकरे यांच्या सहकार्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते किशोरभाई जैन यांनी खासदार सुनील तटकरे यांच्याकडे केलेला पत्रव्यवहार व पाठपुराव्याला यश आले आहे.

रायगड जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या नागोठणे येथे “रेल्वे क्रॉसिंगमुक्त महाराष्ट्र” योजनेअंतर्गत रेल्वे क्रॉसिंग उड्डाणपुलाचा (ओव्हरब्रिज) समावेश करण्यात यावा यासाठी रायगडचे लोकप्रिय खासदार, लोकनेते सुनील तटकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जुलै, २०२६ मध्ये पत्रव्यवहार केला होता. त्याची मुख्यमंत्र्यांनी तात्काळ दखल घेतली असून याप्रकरणी १००.६६ कोटी रुपयांच्या निधी मंजुरीसह या प्रकरणी तातडीने कार्यवाही करावी असे आदेश मुख्यमंत्री सचिवालय कार्यालयातून महारेलचे व्यवस्थापकीय संचालकांना पत्रान्वये देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री सचिवालयाकडून आलेले हेच पत्र खासदार सुनील तटकरे यांच्या मुंबई येथील कार्यालयात बुधवार दिनांक १९ ऑगस्ट रोजी दुपारी संपन्न झालेल्या बैठकीत खा. सुनील तटकरेंकडून महारेलचे व्यवस्थापकीय संचालक राजेश कुमार जयस्वाल यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी सुपूर्द करण्यात आले. यावेळी आमदार अनिकेतभाई तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते किशोरभाई जैन, भाई टके, नागोठणे प्रवासी संघटनेचे सल्लागार ॲड. महेश पवार, अध्यक्ष ऋषिकेश भोय, सचिव संदेश सुकाळे व अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

नागोठण्यातील रेल्वे क्रॉसिंग वरील या उड्डाणपुलामुळे नागोठणे येथील प्रस्तावित रेल्वे ड्राय पोर्ट (रेल्वे यार्ड) विकसित होण्यास मोठी मदत होईल आणि मालवाहतूक अधिक सुलभ होईल, नवीन पूरग्रस्त पुनर्वसित नागोठणे गावठाण (जोगेश्वरी नगर) येथील रेल्वे फाटकात तासनंतास अडकून राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित, जलद व अखंड वाहतुकीचा लाभ मिळेल, नागोठण्याच्या पूर्वेकडील डोंगर भागात असलेल्या वासगावसह लगतच्या गावात मोठ्या संख्येने असलेल्या धनगर समाज बांधवांसह इतर अनेक आदिवासी वाड्यांमधील नागरिकांना नागोठणेतील या रेल्वे क्रॉसिंग च्या ठिकाणी बराच वेळ अडकून राहण्याची महत्वाची समस्या दूर होणार आहे. तसेच वासगाव मार्गे रामेश्वर वैभव या पर्यटन स्थळाच्या परिसरापर्यंत जाणाऱ्या मार्गावरील अनेक गावांतील, विशेषतः ठाकूर, आदिवासी समाजातील नागरिकांची अनेक वर्षांपासूनची वाहतुकीची गैरसोय दूर होईल, प्रस्तावित उड्डाणपुलासोबत रेल्वे मार्गाच्या पूर्व बाजूस २० मीटर रुंदीचा समांतर रस्ता विकसित करण्यात आल्यास कोकण एज्युकेशन सोसायटीच्या नागोठण्यातील बापूसाहेब देशपांडे विद्या संकुलातील पहिली ते पदुत्तर पदवीचे शिक्षण घेणाऱ्या सुमारे ३ हजारच्या वर विद्यार्थ्यांना, नागरिकांना आणि वाहतुकीला मोठा लाभ होईल, उड्डाणपुलापासून कोंडगाव पर्यंत रेल्वे मार्गालगत सेवा रस्ता (सर्व्हिस रोड) विकसित करण्यात आल्यास कोंडगाव व बाहेरशिव परिसराच्या विकासातील अडथळे दूर होतील याशिवाय पॉलीकॅब तसेच रिलायन्ससारख्या मोठ्या औद्योगिक क्षेत्रांच्या विस्ताराला गती मिळेल आणि भविष्यात नवीन उद्योग-प्रकल्प उभारण्यास पोषक वातावरण निर्माण होईल आणि नागोठणे व परिसराच्या विकासाला मोठी चालना या रेल्वे क्रॉसिंग उड्डाणपूलामुळे भविष्यात मिळणार आहे.

नागोठण्यातील या रेल्वे क्रॉसिंग उड्डाणपुलामुळे येथील पूर्वेकडील डोंगर भागातील धनगर समाज, आदिवासी बांधवांची, नागोठणे शहर व विभागातील जनतेची तसेच विद्यार्थ्यांची रेल्वे क्रॉसिंगच्या मोठ्या समस्येतून सुटका होणार असल्याने नागरिकांतून आनंदाचे वातावरण असून रायगड जिल्ह्यातील तमाम जनतेचे नेहमीच हित लक्षात घेणाऱ्या खासदार सुनील तटकरे यांचे नागोठणे शहर व विभागातील नागरिकांनी आभार मानले आहेत.
खा. सुनील तटकरेंच्या माध्यमातून नागोठण्यात पुन्हा वाहणार विकासाची गंगा :
दरम्यान महारेलच्या व्यवस्थापकीय संचालकांसोबतच्या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते किशोरभाई जैन यांनी नागोठण्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम व नवनवीन आणि विविध विकास कामांच्या प्रस्तावांच्या बाबतीत खासदार सुनील तटकरे यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली. किशोरभाई जैन यांनी यावेळी या सर्व बाबतीत खा. सुनील तटकरे यांच्याकडे निवेदन सादर केल्याने लवकरच या प्रस्तावांनाही खासदार सुनील तटकरे यांच्या माध्यमातून प्रचंड निधी उपलब्ध होणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे खासदार सुनील तटकरे यांच्या माध्यमातून नागोठण्यात पुन्हा विकासाची गंगा अवतरणार आहे.




