E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifअपघातआंदोलनकायदा व सुव्यवस्थामहाराष्ट्रयुवाराज्यलोकल न्यूज़वाहतूक
वाहन चालकांच्या जीवाशी खेळ
नागोठणे पोयनाड रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य

रिलायन्स कंपनीच्या नवीन प्रकल्पाच्या कामामुळे वाहन चालकांच्या व स्थानिक नागरिकांच्या जीवाशी खेळ
नागोठणे पोयनाड रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य
पार्किंग अभावी अवजड वाहने रस्त्यावरच केली जात आहेत उभी
वाहन चालक, प्रवासी व नागरिकांना अपघाताचा धोका
नागोठणे | महेश पवार
रिलायन्स कंपनीच्या नवीन प्रकल्पाच्या सुरू असलेल्या कामामुळे नागोठणे व परिसरातील वाहन चलक व नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकल्पाच्या कामासाठी येणाऱ्या व माल वाहतूक करणाऱ्या ट्रक, डंपर, ट्रेलर, कंटेनर यासारख्या अवजड वाहनांमुळे नागोठणे-पोयनाड रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे वाहन चालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांना दररोज मृत्यूच्या छायेतून प्रवास करावा लागत असून रात्रीच्या वेळी तर रस्त्यावरील चिखलामुळे व रस्त्यावर अनधिकृतपणे उभ्या करण्यात आलेल्या अवजड वाहनांमुळे येथे अपघाताचा मोठा धोका निर्माण झाला आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या, नागोठणे मॅन्युफॅक्चरिंग डिव्हिजन या प्रकल्पांतर्गत रिलायन्स कंपनीकडून सुमारे ७० हजार कोटी रुपयांचे नवीन प्रकल्पाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. या नवीन प्रकल्पामुळे नागोठणे परिसराला गुजरात राज्यातील जामनगर परिसरासारखे सुजलाम– सुफलाम करण्याचे गाजर कंपनी प्रशासनाकडून स्थानिकांना दाखवले जात आहे. मात्र असे असतानाच वाहन चालकांच्या व स्थानिक नागरिकांच्या जीवाशी विविध बाबतीत खेळ सुरू असल्याचे वास्तव समोर आले आहे.
प्रकल्पाच्या ठिकाणी येणाऱ्या अवजड वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करण्यात आलेली आहे. मात्र पार्किंगचे सुयोग्य नियोजन करण्यात रिलायन्स कंपनीच्या यंत्रनेला अपयश येत आहे. त्यामुळे ही पार्किंग व्यवस्था अपुरी पडत आहे. परिणामी, ही अवजड वाहने थेट नागोठणे – पोयनाड या मुख्य रस्त्यावरच अस्ताव्यस्तपणे उभी केली जात आहेत. अशाच प्रकारचे काही अवजड वाहतूक करणारी वाहने शुक्रवार दि.१८ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास कुहीरे गावाच्या हद्दीतील रस्त्यावर उभी करण्यात आल्याचे दिसून आले. यातील एक ट्रकची पार्किंग लाईट बंद स्थितीत होती. त्यामुळे हा ट्रक वाहन चालकांना दिसून येत नसल्याने त्याठिकाणी अपघाताचा धोका निर्माण झाला होता.
या ट्रक चालकाला रस्त्यावर वाहन उभे करण्यासंदर्भात प्रस्तुत प्रतिनिधीने विचारले असता, पार्किंगसाठी जागा मिळाली नसल्याचे स्पष्टीकरण त्याने दिले. एकीकडे रस्त्यावर पसरलेला चिखल आणि दुसरीकडे रस्त्याला वेढा घालणारी ही वाहने, यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. दुचाकी वाहने चिखलावरून घसरून लहान-मोठे अपघात घडत असल्याचेही स्थानिकांचे म्हणणे आहे. सध्या गणेशोत्सवानिमित्त सर्वजण आपल्या नातेवाईक व मित्रपरिवाराकडे गणेश दर्शनासाठी जात असल्याने त्यांना या रस्त्यावरील चिखलाचा व अवजड वाहनांचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
या त्रासामुळे स्थानिक नागरिक आणि प्रवाशांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. संबंधित रिलायन्स कंपनीच्या व्यवस्थापनाने आणि स्थानिक वाहतूक पोलीस प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. रस्त्यावरील चिखल तात्काळ साफ करून, अवजड वाहनांसाठी आवश्यक ती पार्किंग व्यवस्था करावी आणि नागरिकांचा प्रवास सुरक्षित करावा, अशी आग्रही मागणी आता जोर धरत आहे.




