Welcome to रायगडचा बुलंद आवाज   Click to listen highlighted text! Welcome to रायगडचा बुलंद आवाज
E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifमहाराष्ट्रयुवाराजकारणराजनीतिराज्यलोकल न्यूज़

खा. सुनील तटकरेंना साकडे

नागोठण्यात उभारण्यात येणाऱ्या उपकेंद्रातून विभागासाठी हवाय स्वतंत्र वीज फिडर

नागोठण्यातील स्वतंत्र वीज फिडरसाठी समृद्धीताई कोळी यांचे खा. सुनील तटकरेंना साकडे

नागोठण्यात उभारण्यात येणाऱ्या उपकेंद्रातून विभागासाठी हवाय स्वतंत्र वीज फिडर
नागोठणे | महेश पवार
नागोठणे शहर व नागोठणे विभागाला गेल्या काही वर्षांपासून वीजपुरवठा वारंवार खंडित होण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे सर्व नागरिक व व्यापारी त्रस्त झाले आहेत. नागोठण्यालगत असलेल्या रिलायन्स कंपनी परिसरात नव्याने वीज उपकेंद्र उभारण्यात येत असलेली माहिती उपलब्ध होत असल्याने या उपकेंद्रातून नागोठणे शहर व विभागासाठी स्वतंत्र फिडर उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य करावे अशी मागणी रोहा पंचायत समितीच्या सदस्या समृद्धीताई कोळी यांनी एका निवेदनाद्वारे करीत खा. सुनील तटकरे यांना नागरिकांच्या प्रश्नासाठी साकडे घातले आहे. 
सुतारवाडी येथील गीताबाग मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात खासदार सुनील तटकरे यांना निवेदन देतेवेळी रोहा पंचायत समितीच्या सदस्या समृद्धीताई कोळी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे नागोठणे विभागीय नेते भाई टके, विभागीय अध्यक्ष संतोषभाई कोळी, शहर अध्यक्ष बाळासाहेब टके, शैलेश रावकर, सुरेश जैन, बिपीन सोष्टे, अंकुश ताडकर, रोशन पारंगे आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.
समृद्धीताई कोळी यांनी खा. सुनील तटकरे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नागोठणे व परिसरातील नागरिकांच्या वतीने आपणास नम्र निवेदन सादर करण्यात येत आहे. नागोठणे विभागात गेल्या काही वर्षांपासून वारंवार वीजपुरवठा खंडित होणे, कमी दाबाने (Low Voltage) वीज मिळणे तसेच तांत्रिक बिघाड झाल्यानंतर वीजपुरवठा पूर्ववत होण्यास मोठा विलंब होणे या समस्या सातत्याने निर्माण होत आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी, लघुउद्योग, शासकीय कार्यालये तसेच पाणीपुरवठा योजनांवर गंभीर परिणाम होत असून सर्वांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
नागोठणे परिसरात औद्योगिकीकरण झपाट्याने वाढत असून नवीन उद्योग, व्यावसायिक आस्थापना आणि वाढती लोकसंख्या यामुळे विजेची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. भविष्यातही या मागणीत मोठी वाढ होणार असल्याने विद्यमान वीज वितरण यंत्रणेवर अतिरिक्त ताण निर्माण होत आहे. त्यामुळे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, नागोठणे येथे नवीन विद्युत सबस्टेशन उभारण्यात येत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
त्यामुळे या नवीन सबस्टेशनमधून नागोठणे विभागासाठी स्वतंत्र वीज फीडर उपलब्ध करून दिल्यास संपूर्ण परिसरातील वीजपुरवठा अधिक सक्षम, अखंडित व विश्वासार्ह होण्यास मोठी मदत होईल. तसेच वारंवार होणारे वीज खंडित होण्याचे प्रकार कमी होतील, तांत्रिक बिघाडाच्या वेळी पर्यायी वीजपुरवठा उपलब्ध होईल आणि नागरिक तसेच उद्योगांना मोठा दिलासा मिळेल. तरी आपण या अत्यंत महत्त्वाच्या विषयामध्ये आपण विशेष लक्ष घालून रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (IPCL), महावितरणचे वरिष्ठ अधिकारी तसेच संबंधित शासकीय विभाग यांच्यासमवेत संयुक्त बैठक आयोजित करून नागोठणे विभागासाठी नवीन सबस्टेशनमधून स्वतंत्र वीज फीडर उपलब्ध करून देण्याबाबत आवश्यक तो पाठपुरावा करावा अशी विनंतीही खा. सुनील तटकरे यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!