Welcome to रायगडचा बुलंद आवाज   Click to listen highlighted text! Welcome to रायगडचा बुलंद आवाज
E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifमहाराष्ट्रराज्यलोकल न्यूज़

श्री जोगेश्वरी मातेची पालखी व उरुस आनंदाने साजरा करा – स. पो.नि.सचिन कुलकर्णी 

पालखी व उरूस या दोन्ही कमिटीला केल्या महत्वपूर्ण सूचना

श्री जोगेश्वरी मातेची पालखी व उरुस आनंदाने साजरा करा – स. पो.नि.सचिन कुलकर्णी 

पालखी व उरूस या दोन्ही कमिटीला केल्या महत्वपूर्ण सुचना 
नागोठणे | महेश पवार
नागोठणे गावची ग्रामदेवता श्री जोगेश्वरी मातेचा  पालखी सोहळा व मीरा मोहिद्दीन शाह बाबा यांचा उरुस आगामी काळात साजरा होणार आहे.  त्यामुळे पालखी सोहळा उरुस  साठी लागणाऱ्या आवश्यक त्या सर्व परवानग्या दोन्ही उत्सव समितीने घ्याव्यात. उत्सवा दरम्यान अफवा पसरवू नका, सोशल मीडियावर वाद होणार नाहीत याची काळजी घ्या, वादग्रस्त बॅनर व झेंडे लावू नका आणि कोणत्याही प्रकारचे वादविवाद न करता शासनाच्या अटी शर्तीचे पालन करत नियमांनुसार सर्व कार्यक्रम शांततेत पार पाडत पालखी सोहळा व उरुस भक्तिमय वातावरणात, सोहळ्यास गालबोट लागणार नाही याची काळजी घेत गुण्यागोविंदाने, आनंदाने तसेच कायदा सुव्यवस्थेला बाधा न येता साजरा करा आणि नागोठणे पोलीस ठाण्याला आपण यापूर्वी जसे सहकार्य केलेत तसेच यापुढेही करा असे बहुमोल मार्गदर्शन नागोठणे पोलिस ठाण्याचे स. पो.नि.सचिन कुलकर्णी यांनी उपस्थित नागरिकांना केले. 
श्री जोगेश्वरी माता पालखी सोहळ्याचे निवेदन देताना उत्सव समितीचे पदाधिकारी)
आगामी येणारे सण उत्सव साजरे करण्यासंदर्भात
नागोठणे पोलीस ठाण्याच्या प्रांगणात मंगळवार दि. २४ एप्रिल  रोजी सायंकाळी ६ वा. आयोजित शांतता समितीच्या बैठकीत सचिन कुलकर्णी बोलत होते. यावेळी श्री जोगेश्वरी माता देवस्थान उत्सव समितीचे अध्यक्ष चंद्रकांत ताडकर,  उपाध्यक्ष संतोष चितळकर, सचिव विवेक देशपांडे, सहसचिव अनिल पवार, सह खजिनदार सतीश पाटील, मीरा मोहिद्दीन शाह  बाबा उरूस कमिटीचे अध्यक्ष काजिम पानसरे, नागोठणे ग्रामपंचायतीचे सदस्य ज्ञानेश्वर सांळुखे, सिराजभाई पानसरे, आसिफ मुल्ला,  मंदार चितळे, महिला दक्षता समितीच्या कल्पना टके, नंदा गायकवाड, शबाना मुल्ला, निलोफर पानसरे, अपर्णा सुटे, संगीता पोलसानी, कांचन शेळके, दिगंबर खराडे, बाबा मुल्ला, राजेंद्र गुरव, हुसेन पठाण, मुजफ्फर कडवेकर, गुड्डू पोत्रिक, पोलीस हवालदार अथर्व पाटील, स्वप्नील भालेकर यांच्यासह नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सपोनि सचिन कुलकर्णी सुचना करताना पुढे म्हणाले की, नागोठण्यातील या दोन्ही मोठ्या धार्मिक सोहळ्यांपूर्वी रामनवमी आणि श्री हनुमान जन्मोत्सव हे धार्मिक सण येत असल्याने सर्वांनी लाऊड स्पीकर व इतर आवश्यक त्या परवानग्या घेऊन, नियमांचे पालन करीत आनंदाने हे उत्सव साजरे करावेत.  श्री जोगेश्वरी मातेच्या पालखी सोहळ्यात पालखीच्या दोन्ही बाजूने दर्शन घ्यावे, पालखी माझ्या घरासमोर नाही म्हणून वाद घालू नका, पालखी सोबत फोटो व सेल्फी काढण्यात खूप वेळ वाया जातो त्यावर नियंत्रण ठेवा, आपल्या संस्कृती, परंपरा आपणच जपायचा आहेत, पालखीचा पारंपरिक मार्ग न बदलता पालखी मागील वर्षीच्या सोहळ्याच्या मानाने यावर्षी त्यापेक्षा कमीत कमी वेळेत मंदिरात कशी पोहचेल यासाठी प्रयत्न करा.  पालखी व उरूस या दोन्ही कमिटीने १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना स्वयंसेवकांचे ओळखपत्र न देणे यांसह दोन्ही कमिटीलाही सचिन कुलकर्णी यांनी महत्वाच्या सूचना केल्या.
डी.जे. आढळल्यास होणार कारवाई :
मातेच्या पालखीत बेंजो, खालुबाजा, नाशिक ढोल अशी पारंपरिक वाद्ये पालखीत वाजवा. डी.जे. वर न्यायालयीन बंदी असल्याने जर कुणी डी. जे. वाजवताना आढळल्यास कारवाई अटळ आहे. पोलिस हे समाजाला दिशा दाखविण्याचे कामच करीत असल्याने त्यांना सहकार्य करा तसेच उत्सव समितीलाही सहकार्य करा. 
दारू पिऊन पालखीत वाद करणाऱ्यांवर होणार कारवाई  : 
वर्षातून एकदा मातेची पालखी आपल्या घरासमोर येणार असल्याने प्रत्येकजण आपापल्या परीने आनंदोत्सव साजरा करीत असतो. मात्र पालखी आपली असून पालखीत कोणतेही गालबोट लागणार नाही याची काळजी सर्वांनी घ्या. त्यामुळे पालखीत दारू पिऊन वाद निर्माण करण्याचा तसेच कायदा व शिस्त याला बाधा निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास कठोर  कारवाई करण्यात येणार आहे. 
उरूस कमिटीलाही केल्या महत्वपूर्ण सूचना  :
नागोठण्यातील उरूस दोन दिवसांचा असतो. त्यामुळे पहिल्या दिवशी संदल निघते तेव्हा उरूस कमिटीच्या सर्वच सदस्यांनी संदल सोबत न येता काहींनी उरूसमध्ये थांबावे, यावर्षी दुकानांची संख्या वाढणार असल्याने त्यासाठी लागणारी लाईट कायदेशीर मार्गाने घ्या, चोरटी लाईट घेऊ नका, खाद्य पदार्थांचा दर्जा चांगला आहे का याची खात्री करून खरेदी करा, उत्सवात अंमली पदार्थ आढळल्यास कारवाई करणार, उरूसमध्ये आपत्कालीन प्रसंगात जनरेटर,  वाहने पार्किंग व्यवस्था व इतर सर्वच बाबतीत चोख व्यवस्था करा. लहान मुले हरविण्याचा घटना गेल्या वर्षी घडल्या  असल्याने ती हरवणार नाहीत याची काळजीही पालकांनी घ्यावी. 
नागोठण्यात पाच दिवस पोलिस यंत्रणा राहणार सज्ज  :
श्री जोगेश्वरी मातेचा पालखी सोहळा व उरूस या दोन्ही धार्मिक उत्सवांसाठी नागोठणे पोलिस ठाण्याच्या यंत्रणेकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. नागोठण्यात येण्यासाठी असलेले दोन्ही बाजूकडील रस्ते उरूस दरम्यान दोन दिवस मोठ्या वाहनांसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत.  उरूस मध्ये दोन ठिकाणी नागरिक मदत केंद्र, अग्निशमन दल, फिरता दवाखाना असलेली असलेली रुग्णवाहिका  व्हॅन उपलब्ध राहणार आहे. तसेच उरूस पार्किंगच्या ठिकाणी सर्वांनी वाहने पार्किंग करावीत. तसेच पार्किंगच्या ठिकाणी पोलिसांची करडी नजर राहणार असल्याचे यावेळी सचिन कुलकर्णी यांनी स्पष्ट केले. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!