E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifनियुक्तीमहाराष्ट्रयुवाराजकारणराजनीतिराज्यलोकल न्यूज़
सचिनशेठ मोदी यांची नियुक्ती
सचिनशेठ मोदी यांचे अनेक मान्यवरांकडून अभिनंदन व शुभेच्छा !
भारतीय जनता पार्टी दक्षिण रायगड व्यापारी सेलच्या जिल्हाध्यक्षपदी सचिनशेठ मोदी यांची नियुक्ती
सचिनशेठ मोदी यांचे अनेक मान्यवरांकडून अभिनंदन व शुभेच्छा !
नागोठणे | महेश पवार
भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत व सक्रिय कार्यकर्ते तसेच नागोठणे शहराचे माजी शहराध्यक्ष सचिनशेठ मोदी यांची भारतीय जनता पार्टीच्या दक्षिण रायगड व्यापारी सेल (बिझनेस विंग) जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती माजी खासदार व भाजप दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष धैर्यशीलदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
अलिबाग येथील भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा कार्यालयात आयोजित कार्यक्रमात आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते नुकतेच सचिन मोदी यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, महिला जिल्हाध्यक्ष चित्राताई पाटील, उत्तर रायगड भाजप जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, आस्वाद पाटील, ॲड. महेश मोहिते, कमळ नागरी पतसंस्थेचे संस्थापक गिरीश तुळपुळे तसेच भाजपचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
नियुक्तीनंतर सचिनशेठ मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, माझ्यावर विश्वास दाखवून पक्षाने ही महत्त्वाची जबाबदारी दिल्याबद्दल मी ज्येष्ठ नेते सतीश धारप साहेब, जिल्हाध्यक्ष धैर्यशीलदादा पाटील, आमदार रवीशेठ पाटील आणि वैकुंठदादा पाटील यांचा मनःपूर्वक आभारी आहे. व्यापारी वर्गाचे प्रश्न सोडविण्यासाठी आणि पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी मी पूर्ण क्षमतेने काम करेन याची ग्वाही सचिन मोदी यांनी दिली.

सचिन मोदी यांनी यापूर्वी नागोठणे शहराध्यक्ष म्हणून उल्लेखनीय काम केले असून, त्यांच्या कार्यक्षमतेची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर आणखी मोठी जबाबदारी सोपविली आहे. ते एमबीए (मार्केटिंग) पदवीधर असून यशस्वी उद्योजक म्हणून त्यांची ओळख आहे. स्वदेशी उत्पादनांच्या प्रसारासाठी ते अनेक वर्षांपासून पतंजली समूहाशी जोडलेले आहेत. सचिन मोदी यांना राजकीय वारसाही लाभला आहे. त्यांचे काका कै. मुलचंदशेठ मोदी यांनी १९७८ मध्ये विधानसभा निवडणूक लढविली होती. नागोठणे परिसरातील सामाजिक व राजकीय क्षेत्रात मोदी कुटुंबाचे नाव आजही आदराने घेतले जाते.

सामाजिक क्षेत्रातही सचिनशेठ मोदी यांचे योगदान उल्लेखनीय आहे. ते विविध आंतरराष्ट्रीय सामाजिक संस्थांचे सदस्य असून रोटरी इंटरनॅशनलमध्ये सक्रियपणे कार्यरत आहेत. विविध आरोग्य शिबिरे, शैक्षणिक संस्थांच्या समस्या सोडविणे तसेच समाजोपयोगी उपक्रमांमध्ये त्यांचा नेहमीच पुढाकार असतो. कोरोना काळात त्यांनी सरकारी रुग्णालयांमध्ये कोरोनाग्रस्तांसाठी शेड उभारणे, खुर्च्यांची व्यवस्था करणे, पिण्याचे पाणी व अल्पोपहाराची सुविधा उपलब्ध करून देणे यासह, ऑनलाइन अर्ज भरता न येणाऱ्या नागरिकांसाठी आपल्या कार्यालयात मोफत मदत केंद्र सुरू करून उल्लेखनीय सामाजिक कार्य केले.
व्यापाऱ्यांच्या हितासाठीही त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. नागोठणे येथील बँक ऑफ बडोदा शाखेत चेक क्लिअर होण्यास होणारा विलंब दूर करण्यासाठी त्यांनी बँकेच्या मुंबई कार्यालयाकडे पाठपुरावा करून CTS प्रणाली सुरू करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. नुकत्याच नागोठणे परिसरात आलेल्या पुरामुळे व्यापाऱ्यांना विमा, नुकसानभरपाई व शासकीय मदती संदर्भातील अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत व्यापारी सेलच्या जिल्हाध्यक्षपदी सचिन मोदी यांची नियुक्ती ही व्यापाऱ्यांसाठी दिलासादायक ठरेल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

रायगड प्रादेशिक विकास आराखडा (Regional Plan) हा दर दहा वर्षांनी अद्यावत करायचा असतो पण १९९२ नंतर अद्ययावत झालेला नसल्याने नागोठणे परिसरातील नागरिकांना बांधकाम परवानग्या, एफएसआय आणि जमिनीच्या आरक्षणासंदर्भात मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या प्रश्नांमुळे नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत असल्याचे सचिन मोदी यांनी सांगितले. बदलत्या लोकसंख्येनुसार नव्याने टाऊन प्लॅनिंग करून एफएसआय, आरक्षण व विकास आराखड्यात सुधारणा करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. या संदर्भातील मागण्या ते ३१ जुलै रोजी रायगड दौऱ्यावर येणारे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमोर मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, नागोठणे शहरात विविध चौकांमध्ये अभिनंदनाचे फलक लावून तसेच प्रत्यक्ष भेटून कार्यकर्ते, व्यापारी व नागरिकांनी सचिनशेठ मोदी यांचे अभिनंदन केले. भाजप रोहा तालुका महामंत्री आनंद लाड यांनी पत्रकारांशी बोलताना, “सचिनशेठ मोदी यांच्या नेतृत्वाखाली व्यापारी सेल अधिक सक्षम होईल. त्यांच्या कार्यक्षमतेमुळे भविष्यात पक्ष त्यांच्यावर आणखी मोठी जबाबदारी सोपवेल,” असा विश्वास व्यक्त केला.
सचिनशेठ मोदी यांच्या निवडीबद्दल भाजपा जिल्हाध्यक्ष धैर्यशीलदादा पाटील, आमदार रवीशेठ पाटील, रायगड जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन खात्याचे सभापती वैकुंठदादा पाटील, पेण नगर परिषदेच्या नगराध्यक्षा प्रीतमताई पाटील, भाजपा जिल्हा उपाध्यक्षा शर्मिलाताई वैकुंठ पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी सचिनशेठ मोदी यांना शुभेच्छा देत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.




